कुलाबा-बीकेसी-आरे (Colaba-BKC-Aarye) या भुयारी मेट्रो 3 (Metro 3) मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला झाला. वीकएंडचेनिमित्त साधून शनिवारी सकाळपासून अनेकांनी या मेट्रोतून सिद्धिविनायक स्थानकापर्यंत प्रवास करत बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, रात्री 9 वाजेपर्यंत आरे ते अत्रे चौकापर्यंत 29 हजार 750, तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) या नवीन टप्प्यात 14 हजार 440 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती 'मुंबई मेट्रो 3' ने दिली.
भुयारी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर शनिवारपासून आरे ते थेट आचार्य अत्रे चौक स्थानकादरम्यान या मेट्रोच्या सेवा सुरू झाल्या. सध्या शाळांना असलेली सुट्टी, वीकएंडचेनिमित्त साधून अनेक प्रवाशांनी दिवसभरात या मेट्रोतून प्रवासाचा आनंद घेतला. आरे ते वरळी हे अंतर 36 मिनिटांत गाठता येत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून सुटका झाली आहे. मुंबईतील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. प्रवासही आरामदायक आहे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी यावेळी व्यक्त केल्या.