प्रत्येक स्त्रीसाठी आयुष्यातील एक अनमोल टप्पा म्हणजे प्रेग्नेंसी आहे. या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. यामध्ये "प्रेग्नंसी योगा" ही संकल्पना सध्या अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या योगप्रकारामुळे गर्भवती स्त्रीचेच नव्हे, तर बाळाचेही संपूर्ण विकासावर सकारात्मक परिणाम होतो, असे आनंदी समूहाच्या योगा एक्सपर्ट स्वप्नाली पिंपळे सांगतात.
स्वप्नाली पिंपळे या गेल्या काही वर्षांपासून गर्भवती महिलांसाठी योगाचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या मते, "जेव्हा एखादी प्रेग्नंट महिला योग्य मार्गदर्शनाखाली योग करते, तेव्हा तिच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे बाळापर्यंत ऑक्सिजन आणि पोषकतत्त्वांचा पुरवठा उत्तम होतो. याचा थेट परिणाम बाळाच्या मेंदूविकासावर होतो."
प्रेग्नेंसीमध्ये अनेक महिला हातपाय सुन्न होणे, पाठदुखी, थकवा अशा समस्यांचा सामना करतात. पण नियमित योगामुळे हे त्रास बऱ्याच प्रमाणात टाळता येतात. विशेष म्हणजे, योगामुळे मानसिक तणाव कमी होतो, 'हॅपी हार्मोन्स' म्हणजेच आनंददायक संप्रेरक स्रवतात, ज्यामुळे गर्भवती स्त्री आनंदी राहते आणि त्याचा परिणाम बाळावरही सकारात्मक दिसून येतो.
"सर्वात महत्त्वाचं म्हणजे, योगामुळे नैसर्गिक प्रसूतीच्या शक्यता वाढतात. पेल्विक फ्लेक्सिबिलिटी वाढल्यामुळे महिलांना लेबर पेन अधिक सहजतेने सहन करता येते," असंही स्वप्नाली पिंपळे स्पष्ट करतात. त्या पुढे सांगतात की, "जर आई आनंदी असेल, तर ती घेत असलेलं कॅल्शियम, इतर पोषकतत्त्व बाळापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे बाळ सुदृढ, निरोगी आणि अॅबनॉर्मलिटीजपासून दूर राहण्याची शक्यता वाढते." प्रेग्नंसी योगा हा केवळ व्यायाम नसून, होणाऱ्या बाळासाठी एक सुंदर, सुरक्षित सुरुवात असल्याचा विश्वास आता अनेक गर्भवती महिलांनाही वाटू लागला आहे. त्यामुळे प्रेग्नंसीच्या काळात योग्य मार्गदर्शनाखाली योगा करणं हे नक्कीच लाभदायक ठरू शकतं.