आज तब्बल 13 वर्षांनंतर राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी भेट दिली. यापूर्वी 16 जुलै 2012 रोजी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून घेऊन मातोश्रीवर आलेले. यानंतर अनेक कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली, मात्र संवाद तितका पाहायला मिळाला नाही. 2021 मध्ये उद्धव ठाकरे आजारी असतानाही राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही. सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या चर्चांनी जोर धरलेला आहे.
5 जुलै 2025 रोजी मराठीच्या मुद्द्यावर दोघांचा एकत्रित विजयी मेळावा देखील संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला. आज 27 जुलै 2025 रोजी पुन्हा एकदा राज-उद्धव यांची भेट झाली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर त्यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मनसे नेतेही राज ठाकरेंसोबत मातोश्रीवर दाखल झाले होते. मातोश्रीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा देखील झाली.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घेऊन बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत प्रवेश केला. तिथे एक अनोखा मेळ पाहायला मिळाला, ज्यात राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीला अभिवादन केलेलं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरेंनी काही जुन्या आठवणींना उजाळा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. मातोश्रीवरील 15 ते 20 मिनिटांच्या चर्चेनंतर राज ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना.