मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीपूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मंत्री उदय सामंत यांच्या सूचक वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. “महायुतीचा महापौर ठरला, की काही लोक नॉट रिचेबल असतील,” असे विधान करत सामंत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात नेमका कोण ‘नॉट रिचेबल’ होणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांना मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले, “नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत, याचा अर्थ काही तरी वेगळंच चाललंय असा फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात कोणतंही गैर नाही. आमचे नगरसेवक सुरक्षित आहेत आणि पक्षाच्या संपर्कात आहेत.”
विरोधकांकडून महायुतीवर आरोप केले जात आहेत की, सत्तेसाठी नगरसेवकांना ‘हॉटेल पॉलिटिक्स’मध्ये अडकवण्यात आले आहे. मात्र हे आरोप फेटाळून लावत सामंत यांनी स्पष्ट केलं की, “महायुतीमध्ये कोणताही गोंधळ नाही. आमच्यात समन्वय आहे आणि महापौर पदावर एकमताने निर्णय होईल.” सामंत यांच्या “नॉट रिचेबल” या विधानाकडे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. काहींच्या मते, महापौर पदाचा निर्णय झाल्यानंतर विरोधक संपर्काबाहेर जातील, तर काहींच्या मते महायुतीतून फुट पडण्याची शक्यता फेटाळण्यासाठी हे विधान केलं गेलं आहे. मात्र सामंत यांनी यावर अधिक खुलासा न करता केवळ “वेळ आली की सगळं स्पष्ट होईल,” असे सांगून चर्चेला अधिक धार दिली आहे.
मुंबई महापालिकेतील महापौर पद हे केवळ औपचारिक नसून, राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या पदासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात समन्वय राखत निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीकडून महापौर निवडीबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी सामंत यांच्या वक्तव्यावर टीका करत, हे विधान लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचा आरोप केला आहे. मात्र महायुतीकडून हे सर्व आरोप राजकीय स्टंट असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच, मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांचे वक्तव्य राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, पुढील काही दिवसांत महापौर पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.