राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना ते ब्राऊन विद्यापीठातल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी या कार्यक्रमात त्यांना तिथल्या शीख विद्यार्थ्याने ऑपरेशन ब्लू स्टारबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेलं उत्तर आता चांगलेच व्हायरल होत आहे.
या ऑपरेशन ब्लू स्टारबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती. ८० च्या दशकात ज्या चुका पक्षाकडून झाल्या आहेत त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. शीख समुदायाबाबत माझ्या मनात आपुलकी आणि आदर आहे. जेव्हा ती घटना घडली तेव्हा मी राजकारणातही नव्हतो. मात्र त्या घटनेची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी अनेकदा सुवर्ण मंदिरात गेलो आहे." या कार्यक्रमातील राहुल गांधींचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
ऑपरेशन ब्लू स्टार प्रकरण नेमकं काय?
पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून भारतीय सैन्याने ऑपरेशन ब्लू स्टार केलं होतं. ऑपरेशन ब्लू स्टार ही भारतीय सशस्त्र दलांनी 1 ते 10 जून 1984 दरम्यान चालवलेली एक लष्करी कारवाई होती. स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी ही हिंसा झाली होती. पंजाबमधील हिंसा, खलिस्तानी चळवळीने निर्माण केलेला गोंधळ मोडीत काढण्यासाठी तत्कालीन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचे आदेश दिले होते. पंजाबमध्ये तणाव वाढला, आणि काही दिवसांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर हल्ला झाला, ज्यामध्ये त्यांची हत्या झाली.