जुलैच्या पहिल्या 20 दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यानंतर अखेर रविवारी रात्रीपासून मुंबई आणि कोकण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः दक्षिण कोकणात, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी मुंबईच्या उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 या 24 तासांत 114.6 mm पावसाची नोंद केली. त्याचवेळी कुलाबामध्ये केवळ 11.2 mm पाऊस झाला. सोमवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत सांताक्रूझमध्ये 87 mm, तर कुलाबामध्ये केवळ 8 mm पावसाची नोंद झाली. विलेपार्ले आणि सांताक्रूझ परिसरात दिवसभरात 90 mmहून अधिक पाऊस पडला.
दक्षिण कोकणातील अलिबाग येथे 90 mm, मुरुड येथे 77 mm, तर श्रीवर्धनमध्ये 65 mm पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेत पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकणासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतही बुधवार आणि गुरुवार या दिवशी काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितले की, वाढती आर्द्रता आणि वाऱ्यांच्या गतीमुळे मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण ओडिशाच्या वरच्या थरात चक्रीय वाताचक्र तयार झाले असून, उत्तर कर्नाटक ते आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय, बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राज्यात 27 जुलैपर्यंत पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कोकणात तुलनात्मकदृष्ट्या पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र मुंबई, ठाणे आणि पालघर येथे बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. ठाण्याला गुरुवारी ‘ऑरेंज अलर्ट’, तर पालघरमध्ये बुधवार आणि गुरुवार मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
याशिवाय, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात मंगळवारपासून, तर पुणे घाट परिसरात बुधवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून त्यासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा