Our secret meeting in Nagpur; Solution to the Vadettiwar-Dhanor dispute? 
ताज्या बातम्या

Maharashtra Politics : नागपुरात काँग्रेसची गुप्त बैठक; वडेट्टीवार–धानोरकर वादावर तोडगा?

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला असून, नागपुरात एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला असून, नागपुरात एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर उपस्थित होते. चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापन आणि पदवाटपावरून निर्माण झालेला वाद मिटवणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी असताना, वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील मतभेदांमुळे पक्ष अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी स्वतः लक्ष घालत दोन्ही नेत्यांना नागपुरात बोलावून समेटाचा प्रयत्न केला. या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली असून, पक्षहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.

सपकाळांचा समन्वय फॉर्म्युला

बैठकीदरम्यान एक समन्वयाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या फॉर्म्युल्यानुसार,

चंद्रपूर महापालिकेचा गटनेता कोण असेल, हे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठरवतील.

वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन गटांपैकी एक गटाला महापौर पद देण्यात येईल.

दुसऱ्या गटाला स्थायी समिती अध्यक्ष पद देण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे.

काँग्रेसला बाहेरून समर्थन देणाऱ्या चार सदस्यांच्या स्थानिक आघाडीला उपमहापौर पद देण्यात येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही गटांना सत्तेत सहभागी करून घेत पक्षातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, गटनेत्याचा निर्णय थेट प्रदेशाध्यक्ष घेणार असल्याने, स्थानिक पातळीवरील संघर्षावर नियंत्रण ठेवण्याचा डाव काँग्रेसने आखल्याचे बोलले जात आहे.

निर्णयावर सस्पेन्स कायम

मात्र या बैठकीत ठरलेला प्रस्ताव विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांना मान्य होईल का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दोन्ही नेत्यांनी उघडपणे आपली भूमिका जाहीर केलेली नसून, त्यांच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हा फॉर्म्युला मान्य झाला, तर काँग्रेसला चंद्रपूरमध्ये सत्तास्थापन करताना मोठा दिलासा मिळू शकतो. अन्यथा, अंतर्गत वादामुळे पक्षाला पुन्हा एकदा राजकीय नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात काँग्रेसला नव्याने संघटन मजबूत करण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत चंद्रपूरसारख्या ठिकाणी गटबाजी वाढणे पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांचा हा हस्तक्षेप किती यशस्वी ठरतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा