जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील निष्पाप नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला भारताने घेतला. 'ऑपरेशन सिंदूर' सुरु करत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करत पाकिस्तानात असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने अनेक भ्याड हल्ले केले. या हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तरदेखील दिले आहे.
शनिवारी सायंकाळी भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. मात्र करार झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्तान सैन्याने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेदेखील शत्रूचे सर्व डाव हाणून पाडले आहेत. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर परराष्ट्र सचिव यांनी सैन्याला निर्देश दिले आहेत. "पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास चोख प्रत्युत्तर द्या", असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले आहेत.