जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. कालच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची गंभीर परिस्थितीचा त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पर्यटकांची परिस्थिती सांगितली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, "हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण असून, अनेक पर्यटक भीतीच्या छायेत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांतील पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. काही पर्यटक नुकतेच दाखल झाले असून काहींच्या परतीच्या विमानाच्या तिकिटांची तारीख अजून पुढे आहे". या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी महाराष्ट्र शासनासह केंद्र सरकारकडे विनंती केली आहे की, अडकलेल्या पर्यटकांची विशेषतः लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांची तातडीने सुरक्षिततेसह परतीची व्यवस्था करावी. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना आवाहन केलं आहे की, या संवेदनशील प्रसंगात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही करावी आणि योग्य ती मदत उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या नेत्या रुपाली ठोंबरे- पाटील यांनी मागणी केली आहे.