जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून, तेथे अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर व नागरिकांनी उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांच्या घरी जाऊन कौस्तुभ गणबोटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांची पत्नी संगीता गणबोटे यांनी त्या घटनेचा थरारक अनुभव सांगितला.
त्यांनी सांगितले की, "आम्ही महिलांनी कपाळावरील टिकल्या काढून टाकल्या, मोठ्याने अजान म्हटल्या, तरी आमच्यावर हल्ला झाला. आम्ही जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. त्या क्षणी आमच्यासोबत कोणीच नव्हते. हा अनुभव आयुष्यभर विसरणं अशक्य आहे."
आज कौस्तुभ गणबोटे यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवदर्शनासाठी कोंढवा परिसरातील साईनगर येथील त्यांच्या घरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.