पहलगाम येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरवात केली आहेत. अशातच आता भारत सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी अनेक राज्यांना 7 मे रोजी 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "आज 14 दिवस झालेत. पाकिस्तानने किंवा दहशतवाद्यांनी ज्या आमच्या 27 लोकांचा बळी घेतला त्यासंदर्भातला बदला काय? दिल्लीमध्ये लोकांच्या भेटीगाठी सुरु आहेत. आपल्याला जपानने पाठिंबा दिला आहे, पुतीनने पाठिंबा दिला आहे. चर्चा सुरु आहेत. उद्या युद्धसराव आहे मॉक ड्रिल. आम्ही त्यालाही तयार आहोत. युद्ध सराव अनेक देशांमध्ये होतात. विशेषता ज्या देशांना सातत्याने युद्धाची भिती असते."
"भारताची जनता ही मानसिकदृष्या मजबूत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्या अडकवून ठेवलं आहे. अनेक देशात आम्ही पाहिलं आहे की एखाद्या देशावर हल्ला झाला तर 24 तासांमध्ये बदला घेतात. आता आमचा युद्धसराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहात का? आता आमच्या युद्ध सराव होईल. भोंगे वाजणार आहेत, ब्लॅक आऊट होणार आहे, महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील. आम्ही 1971 साली हे सर्व पाहिलं आहे. पण जशा टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या. तसे आता युद्ध सरावात आणखी काही दिवस घालवतील. सैन्य हे कायम सज्ज असले पाहिजे."
"देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांना माहित आहे की नाही? याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आमचे प्रधानमंत्र्यांना आवाहन आहे की, तुम्ही ताबडतोप भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे तो ही आर्थिकदृष्ट्या. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहेत. तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही आहे हा देश आहे. एक व्यक्ती नेतृत्व करतंय, एक पक्ष नेतृत्व करतंय म्हणून नाही हा देश सदैव लढायला तयार आहे."
"तुम्ही मॉक ड्रील घेत आहात पण दाखवा तुम्ही काय करताय. आम्ही सरकारबरोबर आहोत, देशाबरोबर आहोत. हा देश आमचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना. किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात. पुढची जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. युद्ध करणं सोपं असते पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्थ राजकीय पक्ष, विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे. पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शाह जे अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना पुढील परिस्थिती सांभाळता येणार नाही. त्यांना पदावरुन हटवायला पाहिजे." असे संजय राऊत म्हणाले.