पाकिस्तानकडून भारताविरोधातील वैमनस्यपूर्ण कारवाया दिवसेंदिवस वाढत असून आता त्या थेट भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मूलभूत गरजांवर केंद्रित झाल्या आहेत. इस्लामाबादमध्ये तैनात भारतीय उच्चायोगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक पाणी व गॅस पुरवठा रोखून त्रास दिला जात असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. ही कारवाई पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा ISI च्या इशाऱ्यावरून होत असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
ही घटना अशा वेळी घडत आहे जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर, जे जिहादी मानसिकतेसाठी कुप्रसिद्ध मानले जातात, अमेरिकेच्या दौर्यावरून भारताला थेट अणुहल्ल्याची धमकी देऊन आले आहेत. “भारताने धरण बांधले तर ते मिसाइल डागून उध्वस्त करू,” असा उघड इशारा त्यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता भारतीय डिप्लोमॅट्सना रोजच्या गरजांमध्ये अडथळा आणण्याची मोहीम सुरू आहे.
भारतीय उच्चायोग परिसरात Sui Northern Gas Pipelines Limited ने गॅस पाइपलाइन टाकलेली असली तरी पुरवठा जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय, स्थानिक गॅस सिलिंडर विक्रेत्यांना हाय कमिशनला सिलिंडर विकू नयेत, असे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. परिणामी भारतीय अधिकारी व कर्मचारी महागड्या दरात बाजारातून पर्याय शोधण्यास भाग पडत आहेत. त्याचप्रमाणे, स्वच्छ पिण्याचे पाणी विकू नये, अशा सूचना पाणी पुरवठादारांनाही देण्यात आल्या आहेत. स्थानिक नळाचे पाणी सुरक्षित नसल्याने भारतीय अधिकाऱ्यांची गैरसोय वाढली आहे.
वियना कन्वेंशननुसार दूतावास आणि उच्चायोगांचा कारभार सुरक्षित, सुरळीत आणि आदर राखून चालवला जाणे आवश्यक आहे. मात्र पाकिस्तानकडून सुरू असलेले हे कृत्य या आंतरराष्ट्रीय कराराचे उघड उल्लंघन आहे. थेट राजनैतिक संवादाऐवजी अशा अप्रत्यक्ष आणि अपारंपारिक मार्गांनी भारताला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते. अलीकडेच भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये यश मिळवले तसेच सिंधू जल कराराला स्थगिती दिली. यामुळे पाकिस्तान बिथरले असून त्यातूनच अशा वैमनस्यपूर्ण हालचालींना चालना मिळाल्याचे विश्लेषकांचे मत आहे.