Pakistani Actress Death : पाकिस्तानच्या कराची शहरातील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA) फेज 6 येथील एका अपार्टमेंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल हुमायरा असघर अली (वय 32) यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हुमायरा यांचा मृत्यू अंदाजे दोन आठवड्यांपूर्वीच झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
8 जुलै रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास गिझरी पोलिसांनी त्यांच्या अपार्टमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी तक्रार केली होती आणि काही दिवसांपासून त्या कोणाशीही संपर्कात नव्हत्या. घरमालकाने अनेक दिवस भाडे न मिळाल्यामुळे कोर्टात अर्जी केली होती. कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली. दक्षिण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सय्यद असद रझा यांनी सांगितले की, "अपार्टमेंट आतून लॉक होते, खिडक्या व बाल्कनीचे दरवाजेही आतून बंद होते. प्राथमिक तपासणीत कोणतीही हिंसक घटना किंवा हत्येचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत."
घटनेची माहिती मिळताच क्राईम सीन युनिटचे फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आवश्यक पुरावे गोळा केले. हुमायरा यांचा मृतदेह जिन्ना पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये (JPMC) पाठवण्यात आला आहे. पोलीस सर्जन डॉ. सुमैया सईद यांनी सांगितले की, "मृतदेहाचा प्रगत कुजण्याचा अवस्थेत होता आणि मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. पोस्टमार्टेम अहवालानंतरच अधिक स्पष्टता येईल."
पोलिसांच्या माहितीनुसार, हुमायरा अली गेल्या काही काळापासून या अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या आणि अनेक महिन्यांपासून घरभाडेही भरलेले नव्हते. त्यांचे नातेवाईक किंवा जवळचे लोक कोठे आहेत, याचा शोध पोलीस मोबाईल फोन रेकॉर्डच्या माध्यमातून घेत आहेत.
हुमायरा असघर अली या पाकिस्तानातील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘तमाशा घर’मध्ये सहभागी झाल्या होत्या आणि 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जलेबी' या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच त्या रंगभूमी कलाकार, चित्रकार, शिल्पकार आणि फिटनेसप्रेमी होत्या, असे त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवर ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांनी शेवटचा सोशल मीडिया पोस्ट 30 सप्टेंबर 2024 रोजी केला होता. सध्या पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, हा नैसर्गिक मृत्यू आहे की आत्महत्या किंवा घातपात, याचा उलगडा पोस्टमार्टेम अहवालानंतरच होणार आहे. पाकिस्तानातील कराचीसारख्या मोठ्या शहरात घडलेली ही घटना कलाविश्वात खळबळ उडवणारी ठरली आहे.
हेही वाचा...