भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबर रोजी होणारा विवाहसोहळा शेवटच्या क्षणी पुढे ढकलण्यात आला आहे. सांगलीमध्ये मोठ्या थाटामाटात सुरू असलेली लग्नाची तयारी अचानक थांबली असून मंडपापासून पाहुण्यांपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज असतानाच घरावर संकट कोसळले.
वडिलांची प्रकृती ढासळल्याने लग्न स्थगित
स्मृतीच्या वडिलांना, श्रीनिवास मानधना यांना लग्नाच्या दिवशीच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या सगळ्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही घटना कुटुंबासाठी मोठा धक्का ठरली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि कुटुंबाच्या भावनिक स्थितीचा विचार करून लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
पलाश मुच्छल मुंबईकडे रवाना
लग्न स्थगित केल्यानंतर मुच्छल कुटुंबीयांनीही निर्णयानुसार हालचाल सुरू केली आहे. पलाश मुच्छल सांगलीतून मध्यरात्री मुंबईकडे निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे. त्यांची बहीण, गायिका पलक मुच्छल आणि अन्य कुटुंबीयांनीही सांगलीचा निरोप घेतला आहे.
तिन्ही दिवसांपासून सांगलीत असलेली भारतीय महिला क्रिकेट टीमही आज सकाळी विशेष वाहनाने मुंबईला रवाना झाली. स्मृतीच्या कुटुंबावर ओढवलेल्या या अचानक घटनेमुळे क्रिकेट जगतात तसेच चाहत्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. सर्व जण श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
स्मृतीने हटवले लग्नाचे पोस्ट
या घटनेनंतर स्मृती मानधनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील लग्नाशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिने ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील गाण्यावर आधारित एक मजेशीर रील टाकून लग्नाची घोषणा केली होती. त्यात तिच्या सहकाऱ्या – जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डीही दिसत होत्या. मात्र हा व्हिडिओ आता तिच्या प्रोफाइलवर उपलब्ध नाही. तिने डिलीट केला की तात्पुरता हाइड केला – याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
पलाशचा विशेष प्रपोज अजूनही चर्चेत
स्मृतीसोबतच्या नात्याचा खास क्षण पलाश मुच्छल याने DY पाटिल स्टेडियममध्ये तयार केला होता. त्याने 21 नोव्हेंबरला स्मृतीला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि तो अजूनही त्याच्या अकाउंटवर पाहायला मिळतो.
स्मृती मानधना–पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आता कुटुंबीयांच्या परिस्थिती सुधारल्यानंतरच निश्चित केला जाणार आहे. सध्यातरी क्रिकेट विश्वाचे लक्ष श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीकडे लागले आहे.