( Parliament Session ) संसदेच्या अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरु होत आहे. दोन आठवड्यांपासून कामकाज ठप्प पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या कामकाजाच्या यादीमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाचा समावेश आहे. हे विधेयक सोमवारीच मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत असून राज्यसभेत मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला 18 ऑगस्टपासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठराव गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला आहे.
मागील आठवड्यात पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी दोन दिवस चर्चा झाली.बिहारमध्ये हाती घेतलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज जवळपास ठप्प पडल्याचे पाहायला मिळाले.