देशाचा बहुप्रतिक्षित केंद्रीय अर्थसंकल्प लवकरच संसदेत सादर केला जाणार असून, यंदा अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात १ फेब्रुवारीलाच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, यावर्षी १ फेब्रुवारी हा रविवार असल्याने त्या दिवशी संसद अधिवेशन होणार की नाही, याबाबत अनिश्चितता होती. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रकुल देशांच्या स्पीकर परिषदेसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ओम बिर्ला यांनी सांगितले की, रविवार १ फेब्रुवारी रोजीच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि त्या दिवशी कोणतीही सुट्टी असणार नाही. सर्व खासदारांनी अर्थसंकल्प सादरीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे संसद रविवारीही कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने जाहीर केले होते की, संसदेचे अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान होईल, तर दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. याच पहिल्या टप्प्यात १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी संसदेच्या परंपरेवरही भाष्य केले. “संसदेचे कामकाज नेहमीच जनहित आणि देशहिताला प्राधान्य देत चालते. देशासाठी महत्त्वाचे काम असेल, तर संसदेची सुट्टीही रद्द केली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्प सादर करणे हे देशाच्या आर्थिक दिशादर्शक धोरणाचे महत्त्वाचे पाऊल असल्याने, रविवारी संसद बसवण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ बाबत देशभरात उत्सुकता आहे. या अर्थसंकल्पात ‘मेक इन इंडिया २.०’ उपक्रमावर विशेष भर देण्यात येणार असून, भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी ठोस रोडमॅप सादर होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये २३ हजार कोटी रुपयांचे नवीन प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्यात येणार असून, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर, ऑटो घटक आणि कॅपिटल गुड्ससारख्या उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादन वाढवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयांमुळे स्वदेशी उद्योगांना चालना मिळण्यासह मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आता सर्व नजर १ फेब्रुवारीकडे लागल्या असून, रविवारी संसदेत सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक दिशेला कोणता नवा वेग देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. रविवारी संसदेत होणारे हे अर्थसंकल्प सादरीकरण केवळ परंपरेचा अपवाद ठरणार नसून, देशाच्या आर्थिक इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.