ताज्या बातम्या

Bajrang Sonawane : खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून दंडाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते बजरंग सोनवणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते बजरंग सोनवणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांनी न्यायालयासमोर आपले उत्तर सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, न्यायमूर्ती ए. एम. वाघवसे यांनी हा आदेश दिला आहे.

सोनवणे यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर माजी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि नारायण शिरसाट यांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अ‍ॅड. शशिकांत शेकडे यांच्यामार्फत सप्टेंबर २०२४ मध्ये सादर करण्यात आली होती. याचिकेच्या सुनावणी दरम्यान ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सोनवणे न्यायालयात हजर झाले, मात्र त्यांनी आपले म्हणणे सादर केले नाही. पुढील सुनावणीतही त्यांनी आवश्यक माहिती न दिल्याने त्यांच्यावर दंड ठोठावण्यात आला.

याचिकेद्वारे निवडणुकीत अनेक अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. माजलगाव येथील बूथ क्रमांक ६८ वरील ७७४ मते ईव्हीएममध्ये नोंदवली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, १,१५६ वैध पोस्टल मते बाद करण्यात आली, तर मतमोजणीत ९०९ मतांचा फरक आढळल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

तसेच, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात सोनवणे यांनी आपला उत्पन्नाचा स्रोत शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यातही काही विसंगती असल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होणार असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या