थोडक्यात
ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली
शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी
पालिकेकडून काही अटींवर परवानगी
Uddhav Thackeray Dasara Melava Permission : अखेर प्रतिक्षा संपली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिकृत माहिती देताच ठाकरेंच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा ठाकरेंचा आवाज घुमणार आहे.
ठाकरे गट गेल्या अनेक महिन्यांपासून या परवानगीसाठी प्रयत्न करत होता. जानेवारीतच अर्ज दाखल करूनही पालिकेकडून काहीच उत्तर मिळत नव्हते. एवढेच नाही तर जवळपास तीन वेळा स्मरणपत्रही देण्यात आले होते. मात्र अखेर महापालिकेने हिरवा कंदील दाखवत ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.
दरम्यान, यंदा शिंदे गटाकडून शिवाजी पार्कसाठी अर्ज दाखल झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची संधी सरळसरळ उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या हाती आली आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच चौथ्यांदा भेट झाली. ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी झालेल्या या चर्चेला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या मंचावर ठाकरेंची डरकाळी नेमकी कोणत्या सूरात घुमेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.