वरळी मतदारसंघातील बहुप्रतिक्षित बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले असून, संबंधित डी आणि ई विंगसाठी भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) देखील अधिकृतरित्या प्राप्त झाले आहे. या महत्त्वाच्या टप्प्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः आपल्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट करून सांगितले की, या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, आता लवकरच रहिवाशांना त्यांच्या नव्या सदनिकांचा अधिकृत ताबा आणि चाव्या प्रदान केल्या जातील.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईच्या मध्यवस्तीतील एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक प्रकल्प आहे. दशकानुदशकं जुन्या आणि धोकादायक झालेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाला गती देण्यात आली होती. आता पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या नव्या, आधुनिक आणि सुरक्षित घरांचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (MHADA) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करत रहिवाशांना जलदगतीने ताबा देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया त्वरित पार पाडण्याची विनंती केली आहे. त्यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, रहिवाशांनी वर्षानुवर्षे या क्षणाची वाट पाहिली आहे आणि त्यामुळे त्यांना कोणतीही विलंब न होता, नव्या घरी स्थलांतर करण्याची संधी मिळावी. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे वरळी परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली असून, सध्या प्रलंबित असलेल्या इतर टप्प्यांचे काम देखील नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावले जाणार आहे.