थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा अर्जासाठी तब्बल 1 लाख डॉलर्सचे नवे शुल्क लावण्याचा निर्णय
H-1B व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया
भारतीय तरुणांच्या कौशल्यामुळे जगाला असुरक्षितता वाटत आहे
(Piyush Goyal) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जासाठी तब्बल 1 लाख डॉलर्सचे नवे शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, भारतीय तरुणांच्या कौशल्यामुळे जगाला असुरक्षितता वाटत आहे. तरीदेखील अनेक देश भारताशी मुक्त व्यापार करार करण्यास आणि व्यापार वाढवण्यास इच्छुक आहेत.
गोयल म्हणाले की, जगातील अनेक देश भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ पाहून प्रभावित झाले आहेत. ते भारताशी संबंध दृढ करण्यासोबतच आपला बाजार खुला करण्याचा विचार करत आहेत. मात्र भारतीय प्रतिभा, त्यांचे ज्ञान आणि नवकल्पना जगासाठी आव्हानात्मक ठरत आहेत, याचीही कबुली त्यांनी दिली.
त्यांच्या मते, भारतीय विद्यार्थ्यांनी आणि व्यावसायिकांनी परदेशात नोकरी किंवा प्रकल्पांच्या मागे न लागता देशांतर्गत संशोधन व डिझाइनकडे लक्ष केंद्रित केल्यास अर्थव्यवस्था आणखी वेगाने प्रगती करेल. त्यांनी सांगितले की, भारताने पहिल्या तिमाहीत 7.8 टक्क्यांची वाढ नोंदवली असून हे जागतिक अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
गोयल पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि त्या दिशेने अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत नेहमीच विजयी ठरेल, अडथळे काहीही असले तरी.
दरम्यान, गोयल 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेला जाणार असून तेथे महत्त्वाच्या व्यापार चर्चांना सुरुवात होणार आहे. अमेरिकेच्या नव्या व्हिसा धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्या आणि व्यावसायिकांसमोर आव्हाने उभी राहिली असली तरी भारत- अमेरिका व्यापार करारातून परस्पर फायद्याचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.