पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी सध्या 20 व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या वाटेकडे लक्ष ठेवून आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जातात. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये, चार महिन्यांच्या अंतराने दिली जाते. मागील 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी खात्यात जमा करण्यात आला होता. त्याआधीचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये देण्यात आला होता.
योजना सुरळीतपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC), जमिनीची पडताळणी आणि आधार-बँक लिंकिंग अनिवार्य केले आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ता थांबवला जाऊ शकतो, अशी अधिकृत सूचना आहे.
ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांना www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘e-KYC’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर आधार क्रमांक टाकून, आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP नंबर नोंदवून प्रक्रिया पूर्ण करता येते. याशिवाय शेतकरी मोबाईल अॅप किंवा जवळच्या CSC (नागरी सुविधा केंद्र) मार्फतही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांची माहिती योग्य व अद्ययावत असेल. त्यांनाच योजनेचा लाभ वेळेत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी पूर्ण करून 20 व्या हप्त्यासाठी आपली पात्रता सुनिश्चित करावी.
हेही वाचा