भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय घाना देशाच्या दौऱ्यावर गेले असून त्यांना तेथील राष्ट्रपती महामा यांनी "घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान" देऊन गौरविले आहे. यावेळी त्यांना गॉड ऑफ ऑनरसह 21 तोफांची सलामी देखील दिली गेली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना सरकारचे आभार मानले. याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे.
घानाची राजधानी अक्रा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले असता तिथे घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांनी नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत केले. त्याचबरोबर भारताच्या पंतप्रधानांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' देऊन सन्मानित केले. तसेच 21 तोफांची सलामीही यावेळी देण्यात आली. गेल्या 30 वर्षात प्रथमच घाना येथे भारतीय पंतप्रधान भेटीसाठी गेले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सन्मान सर्व भारतीयांना समर्पित केला आहे. यावेळी त्यांनी घाना देशाचे आणि राष्ट्रपती यांचे आभार मानले. तसेच घानाला सहाय्य करण्यासाठी भारत नेहमी तयार असेल. आपण दोन्ही देश मिळून दहशतवादाचा सामना करूया, अशी ग्वाही दिली. आपल्या दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले असून ते अधिक दृढ होतील, अशी आशा यावेळी नरेंद्र मोदींनी बाळगली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रशासकीय नेतृत्व आणि त्यांचा जागतिक स्तरावरील नावलौकिक यामुळे त्यांना हा 'किताब देण्यात आल्याचे घानाच्या सरकारने स्पष्ट केले.
या सत्कारानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात दोन्ही देशांच्या चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घानाचे राष्ट्रपती जॉन यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले.
हेही वाचा