'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे आयोजित सभेत पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला. "माझ्या नसांमधून रक्त नव्हे, तर उसळतं, पवित्र सिंदूर वाहतंय. जेव्हा हा सिंदूर बारूदात बदलतो, तेव्हा काय होते ते आता देशाचे शत्रू पाहून चकित झाले आहेत," असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने केवळ 22 मिनिटांत जबरदस्त प्रतिउत्तर देत पाकिस्तानमधील नऊ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांचा नाश केला. "देशाच्या शत्रूंना आणि जगाला हे स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की, भारत आता शांत बसणारा नाही. जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते, त्यांना मातीत मिळवलं," असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर थेट आरोप करत म्हटले की, "स्वातंत्र्यानंतरच्या कित्येक दशकांपासून पाकिस्तान भारतात दहशत पसरवत आहे. निरपराध नागरिकांना मारत आहे, आणि भारतात भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही, म्हणून दहशतवाद हे त्याचे मुख्य शस्त्र बनले आहे."
मोदी पुढे म्हणाले की, "पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की आता येथे उभा आहे मोदी – भारतमातेचा सेवक. माझं मन शांत असलं, तरी रक्त सळसळतं आहे. आता भारत फक्त सहन करणारा देश राहिलेला नाही, हल्ल्याला योग्य वेळ आणि पद्धतीनं प्रतिउत्तर दिलं जाईल."
पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "आता पाकिस्तानसोबत ना व्यापार होणार, ना कोणतीही चर्चा. जर चर्चा झालीच, तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरबाबतच होईल." त्यांनी पाकिस्तानच्या बिकाणेर येथील नाल एअरबेसवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख करत सांगितले की, "त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. उलट भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील रहीमयार खान एअरबेस इतका जबरदस्त झटका बसला की, तो अजूनही ‘आयसीयू’त आहे. कुठे आणि कधी भारत प्रत्युत्तर देईल, हे आपले लष्कर ठरवेल आणि त्यांना त्यासाठी मोकळा हात दिला आहे."
विकास प्रकल्पांचाही शुभारंभ
याच दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी बिकानेरजवळील देशनोक येथे देशातील 103 रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले. बीकानेर-बांद्रा एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून नवे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण केले. त्याचबरोबर 26 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही करण्यात आले.
नाल एअरबेसवरून पंतप्रधान थेट करणी माता मंदिरात गेले, जिथे त्यांनी पूजा-अर्चना केली. त्यानंतर ते पलाना गावात आयोजित जनसभेत सहभागी झाले, जिथे त्यांनी आपले विचार मांडले.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात त्यांनी भारताच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडत पाकिस्तानला कठोर इशारा दिला. दहशतवादाला प्रतिउत्तर देताना भारत आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर विविध विकास योजनांचा शुभारंभ करत त्यांनी जनतेसमोर विकास आणि सुरक्षेचा दुहेरी अजेंडा मांडला.