रामनवमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरममधील नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. हा आशियातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल आहे, जो 2.8 किलोमीटर लांब आहे. हा पूल रामेश्वरम ते मंडपमला जोडतो. यानंतर, पंतप्रधानांनी रामनाथ स्वामी मंदिरात पूजा करत पायाभरणी केली. तसेच तामिळनाडूमध्ये सुमारे 8300 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले. तमिळ भाषेबाबतही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा समाचार घेतला आहे.
तामिळनाडूमध्ये झालेल्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांच्या उद्घाटनात पंबन ब्रिज, नवीन रेल्वे सेवा आणि रामेश्वरम ते चेन्नई अशी चांगली कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे. पंबन ब्रिज हा आशियातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे.
भाषेच्या वादात पंतप्रधान मोदींचा टोमणा
दरम्यान, देशात सुरू असलेल्या भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "त्यांना तामिळनाडूतील अनेक नेत्यांची पत्रे येतात, मात्र त्यावर कधीही तामिळ भाषेत सही केली जात नाही. जर तुम्हाला तमिळ भाषेचा एवढा अभिमान असेल, तर तुम्ही तमीळमध्ये सही करा. तमिळ भाषा आणि तमिळ वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी सरकार या दिशेने काम करत आहे."