ऐतिहासिक विजय:
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात केली. या विजयानंतर संपूर्ण महिला टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
टीम इंडियाने पंतप्रधान मोदींना संघाची जर्सी भेट दिली, ज्यावर सर्व खेळाडूंच्या सही होत्या. या भेटीत कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्ज आणि कोच अमोल मुझुमदार हे उपस्थित होते.
पंतप्रधानांचा उत्साह:
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस खास आहे — देव दिवाळी आणि गुरु पर्व. आज मी तुम्हा सर्वांना ऐकू इच्छितो.”अप्रतिम झेलसाठी प्रसिद्ध असलेल्या हरलीन देओलने पंतप्रधानांना एक मजेदार “ग्लो” संबंधित प्रश्न विचारला, ज्यावरून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं.
दीप्ती शर्माच्या टॅटूविषयी चर्चा:
मोदींनी दीप्ती शर्माला मैदानावरच्या तिच्या “दादागिरी”विषयी विचारलं. त्यावर दीप्ती म्हणाली, “तसं काही नाही सर, पण बॉल थ्रो करताना सगळे म्हणतात थोडं हळू फेक.” पंतप्रधानांनी दीप्तीच्या हातावरील हनुमानाच्या टॅटूबाबत विचारले. त्यांना माझ्या इन्स्टाग्राम टॅगलाइनची माहिती असल्याचं पाहून मला आनंद झाला, असं दीप्ती म्हणाली.
हरमनप्रीतचा चेंडू ठेवण्यामागचा किस्सा:
पंतप्रधानांनी हरमनप्रीतला विचारलं, “तू चेंडू का खिशात ठेवतेस?” त्यावर ती म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे, म्हणून मी तो चेंडू माझ्याकडे ठेवला.” शेफाली वर्माने सांगितले की तिच्या करिअरमध्ये वडिलांचा मोठा हातभार आहे. त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं आणि भाऊही क्रिकेटर आहे असं तीने सांगितलं.