थोडक्यात
फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले.
फलटण पोलीस ठाण्यातील या अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेची बदनामी झाली
Phaltan फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले. फलटण पोलीस ठाण्यातील या अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेची बदनामी झाली असून, या कारणावरून कठोर निर्णय घेण्यात आला. घटनेनंतर बदने काही दिवस फरार राहिले होते. नंतर त्यांनी नाट्यमय पद्धतीने हजेरी लावली, मात्र त्या काळात त्यांनी पोलिसांना चकवा दिल्याचंही समोर आलं. प्रकरण उघड झाल्यापासून सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर या अधिकाऱ्याचे अनेक कथित व्हिडीओ, तसेच लोकांना दिलेल्या त्रासाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. त्यामुळे जनक्षोभही उसळला.
या साऱ्याचा परिणाम म्हणून सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी विशेष चौकशी आदेशित केली. वरिष्ठ अधिकारी घनश्याम सोनवणे यांनी खात्यांतर्गत तपास पूर्ण केला. चौकशीत बदने यांच्या कर्तव्यच्युतीची, सत्तेचा गैरवापर आणि वर्तनातील गंभीर त्रुटींची नोंद झाली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर अहवाल सादर करण्यात आला आणि तत्काळ बडतर्फीचा निर्णय झाला.
सध्या गोपाल बदने न्यायालयीन कोठडीत असून, प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. फलटण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल ही कारवाई आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे प्रकरणात न्यायप्रक्रिया वेगाने पुढे जात असल्याचे संकेत मिळत आहेत आणि पीडित डॉक्टरला न्याय मिळण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.