बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या बहुचर्चित प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची भाजपकडून कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “लैंगिक अत्याचारातील आरोपींशी भाजपला युती चालते का?” असा थेट सवाल करत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली महिलांना आर्थिक मदतीची भाषा करायची आणि दुसरीकडे अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पदं देऊन सन्मानित करायचं, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप राऊतांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात दोन दिवस तीव्र संतापाचं वातावरण होतं, आंदोलनं झाली आणि मुख्यमंत्र्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. ज्या शाळेत हा प्रकार घडला, त्या शाळेच्या व्यवस्थापनावर तक्रार दाखल होऊ नये म्हणून राजकीय दबाव टाकण्यात आल्याचे गंभीर आरोपही त्यांनी केले. “त्या शाळेचे संचालक काही काळ फरार होते, नंतर त्यांनी आत्मसमर्पण केलं. आम्हाला वाटलं ते तुरुंगात असतील, पण आता ते नगरपालिकेच्या सभागृहात बसलेले दिसत आहेत,” असा टोला राऊतांनी लगावला.
तुषार आपटे यांच्या नियुक्तीवर बोलताना राऊत म्हणाले की, या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे आणि आरोपी अजून निर्दोष सिद्ध झालेले नाहीत. “खटला सुरू असताना अशा व्यक्तीला थेट नगरसेवक बनवणं म्हणजे कायदेशीर प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला. भविष्यात त्यांना ‘क्लीन चिट’ देण्याचा मार्ग मोकळा केला जात असल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस काँग्रेस किंवा इतर पक्षांशी युतीवर भूमिका घेतात, मग लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी युती कशी चालते? असा सवाल करत राऊतांनी भाजपवर महाराष्ट्राच्या संस्कृतीशी गद्दारी केल्याचा आरोप केला. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून राज्याला आणि देशाला चुकीचा संदेश देणारा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.