ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून राजकीय वाद; मुख्यमंत्री फडणवीस संतापले

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या दुःखद घटनेनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Published by : Varsha Bhasmare

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या दुःखद घटनेनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर अजित पवार यांच्याकडे असलेली बहुतेक खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, अर्थ खाते मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. तसेच पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र या शपथविधीनंतर राजकीय वर्तुळात वादळ उठले असून, शपथविधी घाईघाईत झाल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. विशेषतः शिवसेनेच्या काही नेत्यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या शपथविधीवरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “दादा गेल्यानंतर लगेच गलिच्छ राजकारण सुरू करण्यात आलं. अजित दादांची राखही शांत झाली नाही आणि सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावण्यात आलं. दहा दिवस उशीर झाला असता तर काय बिघडलं असतं?” त्यांनी या प्रकाराला महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नसलेलं आणि निंदनीय असल्याचं म्हटलं. तसेच शरद पवार यांना शह देण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

याच मुद्द्यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही प्रश्न उपस्थित करत, “हा शपथविधी इतक्या लवकर कुणी आणि का करायला लावला?” असा सवाल केला. तर संजय शिरसाट यांनीही अजित पवार यांच्या निधनानंतर खूप लवकर शपथविधी झाल्याचं मत व्यक्त केलं. या सर्व आरोप-प्रत्यारोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून जो काही वाद सुरू आहे तो पूर्णपणे निरर्थक आणि चुकीचा आहे. “अजित दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मोठे नेते होते. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या दुःखावर राजकारण करणं अतिशय चुकीचं आहे,” असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, प्रत्येकजण या घटनेतून आपलं राजकारण कसं साधता येईल, याच विचारात आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे आणि सर्वांनी संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा काळ दुःख व्यक्त करण्याचा असून, आरोप-प्रत्यारोप करण्याचा नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा