पुणे महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलंच तापलं असून, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी मोठी राजकीय खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अवघ्या 12 तासांच्या आत विविध पक्षांतील 9 बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच भाजप, काँग्रेस, मनसे तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या पक्षांना रामराम ठोकला. या सर्व नेत्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. या घडामोडीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना मोठा धक्का बसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
भाजपचे धनंजय जाधव, मुकारी अलगुडे, शंकर पवार आणि मधुकर मुसळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे, शिवसेना ठाकरे गटाच्या नीता मांजळकर, एकनाथ शिंदे गटाचे आनंद मांजळकर तसेच शरद पवार गटाचे स्वप्निल दुधाने यांचा या पक्षप्रवेशात समावेश आहे. वेगवेगळ्या पक्षांतून आलेले हे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने पुण्यातील प्रभागनिहाय राजकीय गणितं बदलणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाची पुण्यातील ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने अधिक आक्रमक तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात पुण्यात युती असल्याने, या नव्या प्रवेशांचा थेट फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या ‘इनकमिंग’मुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापलं असून, आगामी काळात आणखी काही बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता, राज्यस्तरीय राजकारणातही निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.