सावली बार प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद उद्भवला असून, शिवसेनेतील दोन वरिष्ठ नेते समोरासमोर येताना दिसत आहेत. एकीकडे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी परब यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर "अर्धवट वकील" अशी टीका केली. "हेतुपुरस्सर बदनामी करणारा हा वकील आहे, तू राजीनामा मागणारा कोण?" असा खडा सवाल करत कदमांनी परब यांनी विधानमंडळात मांडलेले आरोप खोटे व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप केला.
काय आहे सावली बार प्रकरण?
मुंबईतील 'सावली बार' हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर नोंदणीकृत असून, याच बारवरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानसभेत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. परब यांनी या बारमध्ये बेकायदेशीर कृत्ये होत असल्याचा मुद्दा मांडला होता. मात्र, त्यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, "सदर हॉटेल शरद शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला देण्यात आले होते आणि त्यासंबंधीचा करारनामा पूर्णपणे कायदेशीर आहे."
"कोणताही बेकायदेशीर व्यवसाय नको", करारनाम्यात स्पष्ट
कदम यांनी पत्रकार परिषदेत करारनाम्याचे कागदपत्र दाखवून सांगितले की, "करारनाम्यात कॉलम 6 मध्ये स्पष्ट नमूद आहे की, कोणताही बेकायदेशीर व्यवसाय चालवला जाणार नाही. तसेच काही गैरप्रकार झाल्यास त्याची जबाबदारी मालकावर नाही, तर चालवणाऱ्यावर राहील."
ते पुढे म्हणाले, "हे नियम मोडले गेले म्हणून आम्ही त्याला तात्काळ बाहेर काढले आणि दोन्ही लायसन्स 13 जुलैलाच संबंधित यंत्रणांना जमा केले आहेत. मात्र, अनिल परब यांनी याच प्रकरणावर 18 जुलै रोजी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. हा थेट दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे."
"योगेश कदम यांचा या हॉटेलशी काहीही संबंध नाही"
रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, "या प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. अनिल परब यांचा हेतूच चुकीचा आहे. ते मुद्दाम बदनामी करत आहेत."
"डान्स बारच्या धंद्याशी आमचा संबंध नाही"
कदम म्हणाले, "आम्ही डान्स बारसारखे धंदे कधीच केलेले नाहीत. परब यांनी विधानमंडळात खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही सभापतींना अर्ज दिला आहे की हे आरोप तात्काळ वगळावेत."
"भविष्यात प्रत्युत्तर मिळेल"
अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांनी मुद्दामून योगेश कदम यांना टार्गेट केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला. ते म्हणाले, "कावळा कितीही कावकाव करतो, त्याची आम्ही दखल घेत नाही. आमच्या मुळावर जो येईल, त्याला उत्तर नक्की मिळेल."
आव्हाडांवर खोचक टोला
नुकताच सनातन धर्मावर विधान करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही कदम यांनी चपखल प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले, "त्यांचा धर्मावर खूप अभ्यास आहे, त्यांनी धर्मगुरूच व्हावं."
शिरसाट यांना सूचक सल्ला
सरकारचा निधी योग्य कामासाठीच लागायला हवा, असे म्हणत रामदास कदम यांनी मंत्री संजय शिरसाट यांना "शाब्दिक भूमिका बदलण्याचा" सल्लाही दिला.
मनसेचं अभिनंदन, लेडिज बारवर कडक भूमिका
मनसेच्या लेडिज बारविरोधातील आंदोलनावर प्रतिक्रिया देताना, रामदास कदम म्हणाले, "त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी योगेशला सांगितले आहे की, महाराष्ट्रात जिथे लेडिज बार असतील ते सगळे बंद करावेत."
"पोलिसांच्या कारस्थानामागेही हेतू"
रामदास कदम यांनी आरोप केला की, काही पोलिसांनी योगेश कदम यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी तडजोड केली नाही, म्हणून हे सर्व घडवले गेले. "या कारस्थानात काही पोलिसांचा सहभाग आहे. मी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोललो असून, याची सखोल चौकशी होणार आहे," असे त्यांनी सांगितले.