Mumbai Pollution : मुंबई आणि इतर काही शहरांतील हवेचं प्रदूषण मोठा मुद्दा बनला आहे. मुंबईत प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. पालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोर्टानेही प्रशासनाला कडक सूचना दिल्या आहेत. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने 200 चा टप्पा ओलांडला असून, त्यामुळे सर्दी, खोकला, आणि श्वसनाचे विकार वाढले आहेत. लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित समस्याही समोर येत आहेत. वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, धूळ आणि हवामानातील बदल हे प्रदूषण वाढण्यामागील मुख्य कारणे मानली जात आहेत. विशेषतः चेंबूर आणि वडाळा भागात याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. चेंबूर-वडाळा परिसरात अमोनियासारखे विषारी वायू पसरल्याचे दिसत आहे, आणि इथे एक्युआय 217 च्या वर पोहोचला आहे.
यामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या तक्रारी, घसा दुखणे, सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे प्रदूषण वाढले आहे, तर बांधकाम प्रकल्पांमुळे उडणारी धूळही एक मोठं कारण आहे. कमी वेगाने वाहणारे वारे प्रदूषक घटकांना शहरात रोखून ठेवत आहेत, ज्यामुळे मुंबईसाठी वायू प्रदूषण एक गंभीर समस्या बनली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम साइट्सला पालिका नोटिसा पाठवत आहे, पण त्यावर काही ठोस उपाययोजना होणार का, हेच एक मोठं प्रश्न आहे.
बीएमसीकडून सांगितलं जातंय की प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केली जात आहेत. पण, हवेचं प्रदूषण अजूनही वाढत आहे. वांद्र्यातील नव्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारत बांधकामस्थळी प्रदूषण नियंत्रणावर गंभीर त्रुटी आढळल्याचं समोर आलं आहे. बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत नियमांचे पालन होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतरही सुधारणा न झाल्यामुळे ‘स्टॉप वर्क’ नोटीस देण्याची तयारी केली जात आहे.
बांधकामस्थळी धूळ नियंत्रणाचे आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात नसल्याचे आढळले आहे. त्रुटींचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात काम बंद करण्याची अधिकृत नोटीस दिली जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणाच्या कुप्रभावी अंमलबजावणीवर नाराजी व्यक्त केली होती. बीएमसी आयुक्त भुषण गगराणी यांनाही याबाबत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.
थोडक्यात
गेल्या काही दिवसांत मुंबईत प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कोर्टाने प्रशासनाला प्रदूषण नियंत्रणासाठी कडक सूचना दिल्या आहेत.
हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने 200 चा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे सर्दी, खोकला, आणि श्वसनाचे विकार वाढले आहेत.
लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या समोर येत आहेत.
वाहनांची वाढती संख्या, बांधकामे, धूळ आणि हवामानातील बदल प्रदूषण वाढण्यामागील मुख्य कारणे आहेत.