90' च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘Big Boss 18 ’ची माजी स्पर्धक शिल्पा शिरोडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली असून, चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. “सावध रहा आणि मास्क घाला,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी आपल्या प्रकृतीविषयी अपडेट दिले आहे. सोमवार, १९ मे रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शिल्पा यांनी लिहिले, “नमस्कार मित्रांनो, मला कोविड-१९ Covid-19 पॉझिटिव्ह आढळले आहे. सुरक्षित रहा आणि मास्क घाला.” त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोनाक्षी सिन्हा, जुही बब्बर, इंदिरा कृष्णा यांसारख्या सहकलाकारांनी त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या बहिणी नम्रता शिरोडकर आणि मित्र चुम दरंग यांनीही प्रेम आणि पाठिंबा दर्शवला.
पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय?
शिल्पा शिरोडकर यांना लागलेला संसर्ग एक गंभीर इशारा मानला जात असून, कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही, हे अधोरेखित आहे. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोना विषाणू संपूर्ण जगात थैमान घातल्यानंतर आता पुन्हा काही ठिकाणी या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अभिनेत्रीने मास्क घालण्याचा आग्रह धरला असून, त्यांच्या आवाहनाला अनेकांचा पाठिंबा मिळतो आहे. १९८९ पासून २००० पर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेल्या शिल्पा यांनी ‘एक मुठी आसमान’ या मालिकेद्वारे १३ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. २०२४ मध्ये त्या ‘बिग बॉस १८’मध्ये देखील दिसल्या, जिथे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकली.
चाहत्यांनी व्यक्त केला चिंता आणि प्रेम
शिल्पा यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांना लवकरात लवकर ठणठणीत बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. काही जणांनी तर “कोविड पुन्हा?” अशी आश्चर्याची प्रतिक्रिया दिली.