आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, जागावाटपावर सध्या अतिशय सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच सर्व प्रश्न मार्गी लागतील. “युती नक्की होईल. यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही,” असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की, महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वयाने चर्चा सुरू आहेत. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात असून, चर्चेची दिशा योग्य असल्याचे संकेत मिळत आहेत. “मला अपेक्षा आहे की, येत्या काही दिवसांत जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यांच्या सोबत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार तसेच प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख नेते या चर्चांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. “काल रात्रीपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व चर्चा अत्यंत सकारात्मक मार्गावर आहेत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील जागावाटपावरून काही दिवसांपासून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे युतीतील घटक पक्षांमध्ये एकमत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. फडणवीस यांनी सूचित केले की, सर्व पक्ष एकमेकांच्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लवकरच जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होऊन निवडणुकीच्या तयारीला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.