मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी मतमोजणी सुरू असून सायंकाळपर्यंतचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत भाजपने सर्वाधिक 51 जागांवर विजय मिळवला आहे, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेने 48 जागा जिंकल्या आहेत. इतर पक्षांमध्ये शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस, मनसे, एमआयएम आणि समाजवादी पक्षालाही काही जागांवर यश मिळाले आहे.
या निवडणुकीत जोगेश्वरी परिसरातून मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. खासदार रवींद्र वायकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात एकही जागा राखता आली नाही. आठही प्रभागांत ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेने बाजी मारली. वायकर यांना आपल्या कुटुंबातील उमेदवारालाही विजयी करता न आल्याने त्यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरम्यान, संपूर्ण मुंबईचा विचार करता भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना सत्तेकडे वाटचाल करत असल्याचे संकेत आहेत. मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे. मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत सत्ताबदल होण्याची दाट शक्यता दिसत आहे.