बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीला नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला होता. सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं पत्र माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना लिहिलं आहे. या सगळ्या गोंधळानंतर प्राजक्ता माळीनं प्रतिक्रिया दिली होती. देवाच्या दारी कुणीही सेलिब्रेटी नसतो, प्रत्येक जण भक्त असतो, त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर प्राजक्ता माळीनं प्रतिक्रिया दिली होती. मात्र आज माळीनं सोशल मीजियावर एक व्हिडीओ शेअर करत या कार्यक्रमासंदर्भात मोठी निर्णय घेतला आहे. प्राजक्ता माळीनं कार्यक्रमात नृत्य न करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राजक्ता माळी का म्हणाली?
"त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा 'शिवार्पणमस्तु' हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही अशी ठरलं होतं. कारण मंदिराचं प्रांगण, तिथलं क्षेत्रफळ, तिथे किती माणसं पाहण्यासाठी बसू शकतात, या सर्व गोष्टी पाहता, मीसुद्धा सोशल मीडियावर या कार्यक्रमाबाबत अजिबात माहिती दिली नव्हती. पण, काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भिती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे आणि त्यामुळेच मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेतला आहे की, माझ्याशिवाय कार्यक्रम होईल... कमिटमेंट आहे, त्यामुळे कार्यक्रम होईल. पण मी कार्यक्रमात परफॉर्म करणार नाही."
"माझे सहकलाकार परफॉर्म करतील. अर्थातच यामुळे माझ्या आनंदावर विरझण पडणार आहे. पण, वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर ताण येऊ नये, त्यामुळे ही बाब मला आपल्यापेक्षा मोठी वाटते. अर्थातच जिथे भाव असतो, तिथे देव असतो. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली, तरी शिवापर्यंत ती पोहोचेल. तिथे कुणाचाही हिरमोड होऊ नये आणि कुणाच्याही मनात, कसलीही शंका उपस्थित होऊ नये म्हणून केवळ माहितीकरता मी हा व्हिडीओ बनवतेय...", असं प्राजक्ता माळी म्हणाली.