थोडक्यात
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग पेटला आहे.
बीडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचे विधान केले.
या वक्तव्याने बीडपासून मुंबईपर्यंत राजकीय तापमान वाढले आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग पेटला आहे. बीडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचे विधान केले. या वक्तव्याने बीडपासून मुंबईपर्यंत राजकीय तापमान वाढले आहे. M भुजबळांच्या या विधानावर आता प्रकाश महाजन यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी भुजबळांना थेट सल्ला देताना म्हटले, “अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ-बहिणींमध्ये मिठाचा खडा टाकू नका.” तसेच, “दुसऱ्यांच्या घरात वारस ठरवण्याआधी स्वतःचा वारस कोण? मुलगा की पुतण्या हे ठरवा,” असा टोला त्यांनी लगावला.
प्रकाश महाजन म्हणाले, “क्या जमाना आ गया! स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवत आहेत? एक जण जो अनेक महिने कारागृहात होता आणि दुसरी जी रोज उठून स्वतःचं कुंकू जगासमोर उधळते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा हा फक्त आणि फक्त पंकजा ताई मुंडे यांचाच आहे, दुसरे कोणी नाही.” महाजन यांनी पुढे सांगितले की, “पंकजा मुंडे यांना जनतेने स्वतः वारसदार म्हणून मान्यता दिली आहे. त्यांनी संघर्षातून हा वारसा मिळवला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर लोकांनी पंकजामध्येच त्यांचा आत्मा पाहिला. ती लोकसभा निवडणुकीत हरल्यानंतर 5 जणांनी आत्महत्या केली होती, हे विसरता कामा नये.”
महाजन यांनी आपल्या या तीव्र प्रतिक्रियेची नोंद फेसबुक पोस्टद्वारे घेतली असून, करुणा शर्मा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यानंतर ही पोस्ट त्यांनी शेअर केली. छगन भुजबळांवर टीका करताना महाजन पुढे म्हणाले, "पंकजा मुंडे त्या मेळाव्याला उपस्थित नव्हत्या, म्हणूनच भुजबळांनी असे विधान केले असावे. पण आम्ही जर समीर भुजबळांना तुमचे वारसदार म्हटले, तर तुम्हाला ते चालेल का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे, भुजबळांच्या विधानाने सुरू झालेला हा वाद आता मुंडे कुटुंबातील राजकीय वारसदारीवरून थेट सामना पंकजा विरुद्ध धनंजय अशा स्वरूपात रंगताना दिसत आहे.