मुंबईत 18 ऑगस्टला होणारी दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक यंदा थेट राजकीय रंग घेते आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेची संभाव्य युती चर्चेत असतानाच, बेस्ट पतपेढीच्या मैदानात मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेना आणि राज ठाकरेंच्या बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांनी एकत्रित येऊन उत्कर्ष पॅनल तयार केलं आहे. 21 जागांच्या निवडणुकीत ठाकरे गट 19 आणि मनसे 2 जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. या युतीमुळे प्रतिस्पर्ध्यांना चांगलंच आव्हान निर्माण झालं आहे.
या ठाकरे आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजपने सहकार समृद्ध पॅनल उभं केलं असून, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू माजी आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मोर्चा सांभाळत आहेत. "दोन्ही ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत," असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
प्रसाद लाड यांनी आरोप केला की, "सहकारात पक्षीय राजकारण न आणण्याचं ठरलं होतं. पण ठाकरे बंधू आता पक्षाच्या नावावरच लढत आहेत. उद्धव ठाकरे यांचं सहकारातील योगदान शून्य आहे. ते पक्ष म्हणून येणार असतील, तर मीही पाच पांडवांचा कृष्ण बनून मैदानात उतरेन." लाड यांनी सहकारातील आपला अनुभव सांगत, "मी 20 वर्ष या क्षेत्रात आहे, तर प्रवीण दरेकर 25 वर्षांपासून सहकारी बँकेत सक्रिय आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे," असंही म्हटलं.
बेस्ट पतपेढीतील ठाकरे-मनसे युतीमुळे महापालिका निवडणुकीतही अशीच हातमिळवणी होईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. युतीसंबंधीचा निर्णय पक्षपातळीवर होईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर दोन्ही ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. 18 ऑगस्टला 21 पदांसाठी होणाऱ्या मतदानाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाकरे युती आणि भाजप पॅनलमधील हा थेट सामना केवळ सहकारी संस्थेपुरता मर्यादित न राहता, महापालिका निवडणुकीच्या रंगीत तालमीसारखा ठरणार आहे.