Manoj Jarange Protest : मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावरून आता राजकीय वादंग अधिकच तीव्र झाला आहे. आंदोलकांच्या वर्तणुकीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एका माध्यमाच्या कार्यक्रमात आंदोलन मनोज जरांगे यांच्या हाताबाहेर गेले आहे का असा सवाल विचारला गेला. यावर बोलताना दरेकर म्हणाले की "आंदोलक आझाद मैदानात घाण करत आहेत रस्त्यावर अंघोळ करत आहेत तर काही रेल्वे स्थानकावर कबड्डी आणि हुतूतू खेळत आहेत. पोलीस बॅरेकेट्सचा खेळण्यासाठी वापर होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून अशा दृश्यांमुळे आम्हालाच लाज वाटते असे त्यांनी सांगितले. आम्हीही मराठे आहोत पण ज्या पद्धतीची वागणूक दाखवली जातेय त्यामुळे अपमान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत घडलेला प्रकारही त्यांनी उल्लेखून हा मराठा समाजाचा आदर्श आहे का असा सवाल उपस्थित केला. तसेच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येते का हेही आंदोलक गंगाधर काळकुटे यांना विचारले."
या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आंदोलन हाताबाहेर गेल्याचे निरीक्षण नोंदवत राज्य सरकारला कायद्यानुसार कारवाईचे निर्देश दिले. दरम्यान मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलकांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की "मुंबईकर रोज अमराठी लोकांची गर्दी सहन करतो तर आता आपले मराठी भाषिक आले आहेत यात वावगे काही नाही. थोडा त्रास झाला तरी अभिमानाने सहन करायला हवा. माझे राजसाहेब नेहमी सांगतात की मुंबई ही मराठी माणसाच्या बापाची आहे" असेही ते म्हणाले.