गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि महत्वाची अवस्था असते. या कालावधीत केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि भावनिक स्तरावरही अनेक बदल घडत असतात. त्यामुळे संपूर्ण ९ महिन्यांचा प्रवास हा नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक पार पडणं आवश्यक ठरतं. तपासण्या, आहार, व्यायाम, विश्रांती आणि मानसिक स्वास्थ्य या पाच मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित केल्यास मातृत्वाचा हा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो.
गर्भधारणा झाल्यानंतर लगेचच योग्य वैद्यकीय तपासण्या सुरू करणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रक्त आणि लघवी तपासणी करून संपूर्ण आरोग्य स्थिती जाणून घेतली जाते. यासोबतच वेळोवेळी सोनोग्राफी करून गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत किमान ८ वेळा वैद्यकीय तपासणी करणे आदर्श ठरते.
या काळात गर्भाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यावश्यक आहे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, कडधान्ये आणि भरपूर पाणी यांचा समावेश असावा. यासोबतच लोह, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिडसारखी आवश्यक पूरक औषधे नियमितपणे घेणे गर्भाच्या सुदृढ विकासासाठी उपयुक्त ठरते.
नियमित चालणे, सौम्य योगासने आणि प्राणायाम हे केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी नव्हे, तर नैसर्गिक प्रसूतीसाठी देखील उपयुक्त ठरतात. मात्र, यामध्ये अतिरेक टाळावा आणि पूर्वी गर्भपात किंवा वेळेआधी प्रसूती झाली असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानूसारच व्यायाम करावा. दुपारी किमान दोन तास आणि रात्री पुरेशी झोप घेणे गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.
गर्भधारणा ही शारीरिक प्रक्रियेसोबत मानसिक तयारीचीही गोष्ट आहे. तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की, स्त्री मानसिकदृष्ट्या तयार असेल तेव्हाच गर्भधारणा व्हावी. सकारात्मक विचार, तणावमुक्तता आणि भावनिक आधार हा संपूर्ण प्रवास सुलभ करतो.