अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Constituency) पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.
पोटनिवडणूक पारदर्शक, अचूक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आयोगाच्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव मतदार यादीत नोंदणीकृत असलेले मतदारच या पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतील.
या विशेष कार्यक्रमानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. नाव वगळणे, नवीन नाव समाविष्ट करणे, पत्ता दुरुस्ती किंवा इतर तक्रारी यासाठी नागरिकांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकतींची सखोल छाननी करण्यात येणार असून, 6 मार्च 2026 पर्यंत त्या निकाली काढण्यात येतील. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
दरम्यान, या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच मतदान केंद्रांची यादी, मतदारसंख्या आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या पातळीवर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसोबत बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व अभिप्राय घेण्यात येणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणाकडे राज्यभराचे लक्ष लागले असून, आगामी पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून बारामतीचा नवा राजकीय वारस कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.