भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणात सुरु असलेल्या न्यायालयीन चौकशी आयोगा समोर काल सुनावणी झाली. या सुनावणीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेले एक महत्त्वाचे पत्र आयोगासमोर सादर करण्याची मागणी केली होती.
या पत्रात भीमा कोरेगावमधील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. हे पत्र त्या काळात प्रसारमाध्यमांमधूनही चर्चेत आले होते. जर हे पत्र अद्याप शरद पवार यांच्याकडे उपलब्ध असेल, तर सत्य समोर यावे आणि ते आयोगासमोर मांडले जावे, अशी मागणी अॅड. आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समितीसमोर आपली साक्ष दिली आहे. या साक्षीत त्यांनी घटनेबाबतची आपली माहिती आणि निरीक्षणे मांडली. त्या काळात नेमकं काय घडलं होतं?, यासंदर्भातील उल्लेख शरद पवार यांनी उल्लेख समिती समोर केले आहेत. आयोगाने या बाबतीत विचार घेऊन लवकरच निर्णय घेण्याची तयारी दर्शवली असून पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.