पोटगीपासून वाचण्यासाठी स्वत:ला बांधकाम मजूर असल्याचे भासवणाऱ्या पतीचा खोटारडेपणा कोर्टात उघड झाला आहे. पत्नी व मुलाच्या पोटगीसाठी सुरू असलेल्या खटल्यात वकिलांनी केलेल्या उलट तपासणीत हा पती कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कौटुंबिक न्यायालयाने दरमहा पत्नीला 7 हजार आणि मुलाच्या संगोपनासाठी 8 हजार रुपये पोटगी मंजूर केली आहे.
पूजा गव्हाणे हिचे लग्न फेब्रुवारी 2020 मध्ये माळेगाव बु. (ता. बारामती) येथील अमोल गव्हाणेशी झाले होते. एक वर्षातच त्यांच्या पोटी मुलगा झाला. मात्र मुलाच्या हृदयात छिद्र असल्यामुळे उपचारांवर मोठा खर्च झाला. या कारणावरून सासरच्यांनी त्रास देणे सुरू केले आणि पूजा 2021 मध्ये पतीपासून विभक्त झाली.
पोटगीसाठी पूजाने कोर्टात अर्ज केल्यानंतर अमोलने आपण बांधकाम मजूर असून केवळ 150 रुपये रोज मिळतात, असे दाखवले. मात्र अॅड. रमेश घोडके-पाटील यांनी केलेल्या सखोल उलट तपासणीत अमोलच्या कुटुंबाचे कोट्यवधींचे उत्पन्न समोर आले.
उघड झालेले महत्त्वाचे मुद्दे:
अमोल महागड्या कारमध्ये फिरतो, अंगावर लाखो रुपयांचे दागिने असतात.
त्याच्या भावाच्या लग्नात 16 लाखांहून अधिक खर्च करण्यात आला.
कुटुंबाच्या नावावर जमीन, व्यवसाय (हॉटेल व डेअरी) आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.
या सर्व गोष्टी लक्षात कोर्टाने पूजाच्या बाजूने निर्णय देत पोटगी मंजूर केली.