पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता राजभवनात मुंबईतील भाजप आमदार आणि खासदारांसोबत बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे, तसेच पंतप्रधान आमदार-खासदारांना मार्गदर्शन करतील.
आज सकाळी पंतप्रधानांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. या सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमही या बैठकीत सहभागी राहणार आहेत. पंतप्रधानांनी मुंबईतील सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना कानमंत्र देऊन आगामी निवडणुकांसाठी दिशा दाखवण्याचा कार्यक्रम आखला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला आहे. विमानतळाची उभारणी अदानी समूह आणि सिडको यांनी संयुक्तपणे केली आहे. अदानी समूहाकडे 74% तर सिडकोकडे 26% मालकी असून, डिसेंबरपासून प्रवाशांना सेवा उपलब्ध होणार आहे. संपूर्ण प्रकल्पात चार टर्मिनल उभारणीसाठी नियोजन झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष सक्रिय झाले असून, भाजपने मुंबई महानगपालिका व इतर स्थानिक निवडणुकांसाठी तयारीला वेग दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या या बैठकीला राजकीय व प्रशासनिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे.