दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भूतान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी थिंपू येथे जनसभेला संबोधित करताना म्हटलं, “मी आज जड अंतकरणाने इथे आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयावह घटनेने सर्वांचं मन व्यथित झालं आहे. या स्फोटामागे जे आहेत, ज्यांनी हे षडयंत्र रचले आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही.” मोदी म्हणाले की, “तपास सुरू आहे. आम्ही तपासाच्या शेवटापर्यंत जाणार आहोत. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी काल रात्रीपासूनच तपास यंत्रणांशी संपर्कात आहे.”
पंतप्रधानांनी पीडित कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करत म्हटलं, “संपूर्ण देश त्यांच्या सोबत आहे. सरकार प्रत्येक गोष्टीची चौकशी करत आहे.” दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत सांगितले की, “तपास यंत्रणा सर्व अंगांनी तपास करत आहेत. रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल. कोणत्याही दोषीला सोडणार नाही.”
या स्फोटानंतर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनआयए आणि दिल्ली पोलिसांचा विशेष तपास पथक घटनास्थळी कार्यरत असून सिसीटीव्ही फूटेज आणि संशयित वाहनांच्या हालचालींचा तपास सुरू आहे.