पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त देशातील शास्त्रज्ञांना गंभीर अवकाश संशोधनासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की चंद्र आणि मंगळावर यशस्वी पावलं ठेवलेल्या भारताने आता अधिक खोल अवकाशाचा शोध घ्यायला हवा.
मोदी यांनी स्पष्ट केलं की भारत अर्ध-क्रायोजेनिक इंजिन्स आणि इलेक्ट्रिक प्रपल्शनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे. निकट भविष्यात गगनयान मोहिमेचं प्रक्षेपण होणार असून, पुढील काही वर्षांत भारत स्वतःचं अवकाश स्थानक उभारणार आहे. त्यांनी तरुणांना ‘अंतराळवीर पूल’मध्ये सहभागी होऊन देशाच्या महत्वाकांक्षा साकार करण्याचं आवाहन केलं.
खाजगी क्षेत्रालाही मोदींनी पुढे येऊन पुढील पाच वर्षांत किमान पाच मोठे स्पेस युनिकॉर्न्स उभारण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की सध्या वर्षभरात पाच रॉकेट्सचं प्रक्षेपण होतं, ते प्रमाण वाढवून आठवड्याला एक म्हणजे वर्षाला 50 प्रक्षेपण करण्याचं लक्ष्य आपण ठेवायला हवं.
आज देशात 350 हून अधिक स्टार्टअप्स अवकाश क्षेत्रात कार्यरत असून, ते नवोन्मेष आणि प्रगतीचे केंद्र बनले आहेत. मोदींनी सांगितलं की खाजगी क्षेत्राने विकसित केलेला पहिला पीएसएलव्ही रॉकेट लवकरच प्रक्षेपित होणार आहे. तसेच पहिला खासगी संवाद उपग्रह विकसित होतो आहे आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या मालिकेवरही काम सुरू आहे.
पंतप्रधानांच्या मते, अवकाश क्षेत्रामुळे भारतातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार व संशोधनाच्या संधी निर्माण होत आहेत. भारताने डॉकिंग-अनडॉकिंग तंत्रज्ञान आत्मसात करून जगातील चौथं राष्ट्र होण्याचं यश मिळवलं आहे. मोदी यांनी उदाहरणं देत सांगितलं की पीक विमा, मच्छीमारांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि ‘पीएम गती शक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅन यांसारख्या योजनांमध्ये अवकाश तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू आहे.