पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वतःवर आणि त्यांच्या दिवंगत आई हीराबेन मोदींवर करण्यात आलेल्या अपमानास्पद वक्तव्यांना उत्तर दिलं आहे. “मी भगवान शिवाचा भक्त आहे, शिव्यांचं विष प्राशन करायला शिकलो आहे. जनता माझा देव आहे, माझं रिमोट कंट्रोल आहे. माझं दु:ख मी त्यांच्यासमोर मांडतो,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
आसाममधील दरंग येथे विविध प्रकल्पांचं उद्घाटन करताना मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. “मला माहीत आहे, काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा माझ्यावर हल्ला करेल आणि म्हणेल की मोदी पुन्हा रडत आहेत. पण मी माझ्या जनतेपुढेच माझं दुःख मांडणार. कारण जनता माझा स्वामी, माझी देवता आहे,” असं ते म्हणाले.
बिहारमधील दरभंगा येथे काँग्रेस–आरजेडीच्या व्यासपीठावरून मोदी आणि त्यांच्या आईविषयी केलेल्या शिवीगाळीवरून वाद पेटला आहे. याबाबत भाजपने “हा मातृशक्तीचा अपमान” असल्याचं म्हटलं असून काँग्रेसने हा प्रकार “अतिशयोक्ती” म्हणून फेटाळून लावला आहे.
मोदींनी भाषणात आसामचे सुपुत्र व प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांचा उल्लेख केला. “ज्या दिवशी सरकारने भूपेन हजारिकांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की मोदी ‘गायक-नर्तकांना’ पुरस्कार देत आहेत. हा आसामचा आणि देशाचा अपमान आहे,” असं ते म्हणाले.
मोदींनी काँग्रेसवर देशहितापेक्षा मतदारसंख्येचा विचार केल्याचा आरोप केला. “काँग्रेसने आसाममध्ये दशकानुदशकं सत्ता भोगली, पण ब्रह्मपुत्रेवर केवळ तीन पूल बांधले. आम्ही दहा वर्षांत सहा पूल उभारले. काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिलं, देशद्रोह्यांचं रक्षण केलं. आज ते पाकिस्तानच्या अजेंड्यावर चालतात,” असा इशाराही त्यांनी दिला.
27 ऑगस्ट 2025 रोजी दरभंगा (बिहार) येथे राहुल गांधींच्या ‘व्होटर अधिकार यात्रा’ दरम्यान काँग्रेस–आरजेडीच्या व्यासपीठावरून काही व्यक्तींनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईवर अपशब्द काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर BJP ने काँग्रेसवर टीका करत हा प्रकार महिलांचा अपमान असल्याचं म्हटलं. पोलिसांनी या प्रकरणी मुहम्मद रिझवी उर्फ राजा याला अटक केली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
मोदींनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, “ही माझ्या आईची नव्हे तर देशातील प्रत्येक आई-बहीणीची अवमानना आहे. मी माफ करू शकतो, पण भारत माता हे कधीच माफ करणार नाही.”