पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण करण्यात आले. अत्याधुनिक इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या भव्य पुलाचे रेल्वे प्रवासासाठी औपचारिक उद्घाटन आज पार पडले.
चिनाब रेल्वे पूल हा समुद्रसपाटीपासून 467 मीटर आणि चिनाब नदीपासून 359 मीटर उंचीवर आहे. विशेष म्हणजे, या पुलाची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा तब्बल 35 मीटर अधिक आहे. एकूण 1,300 मीटर लांबीच्या या भव्य पुलावरून रेल्वे 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करू शकते. या प्रकल्पासाठी 22 वर्षांचा कालावधी लागला असून एकूण 1,486 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. पुलाच्या उभारणीत 29,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक क्षणी पंतप्रधानांनी पुलावर राष्ट्रध्वज फडकवला आणि पुलावरून चालत जात हा ऐतिहासिक अनुभव घेतला. त्यानंतर त्यांनी रेल्वेमधून प्रवासही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असून विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. चिनाब रेल्वे पूल हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून कनेक्टिव्हिटी आणि विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.