Pune News : पुण्यातील राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता त्यावर पाणी फिरल्याचे संकेत मिळत आहेत. पुण्यात संभाव्य युती जवळपास तुटल्याचे समजत असून, यामागे निवडणूक चिन्हाचा वाद कारणीभूत ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर यासाठी अनुकूल वातावरण होते आणि दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये बैठकाही झाल्या होत्या. मात्र उमेदवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर एकमत न झाल्याने ही चर्चा थांबली आहे.
अजित पवार गटाने पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी ‘घड्याळ’ या चिन्हाचा आग्रह धरल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांसाठी ‘तुतारी’ या चिन्हावर ठाम भूमिका घेतली. यामुळे दोन्ही गटांमध्ये मतभेद वाढले आणि युती होण्याची शक्यता कमी झाली.
या घडामोडीनंतर शरद पवार गटाने वेगळी दिशा घेतल्याचे दिसत आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने पुण्यात तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते. या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलत असून, येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणासोबत असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
पुण्यातील राजकारणात मोठी उलथापालथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा होती
आता युती तुटल्याचे संकेत मिळत आहेत
यामागे निवडणूक चिन्हाचा वाद कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांकडून
पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह