पुरंदर तालुक्यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्व्हे शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र गावकऱ्यांनी याला विरोध केला आहे. यामधून आंदोलक शेतकरी आणि पोलिस आमनेसामने आले आणि शेतकऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ही परिस्थिति नियंत्रणाबाहेर गेली.
गावामध्ये परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. मात्र या लाठीचार्जमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आता गावकऱ्यांनी केला आहे. या घटणेमुळे परिसरात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरंदर विमानतळासाठी सुरु असणाऱ्या ड्रोन सर्व्हेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोनचा सर्व्हे बंद करण्यास भाग पाडले होते. या घटनेमुळे प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त मागवला. यानंतर पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये झटपट झाली. पोलिसांनी अश्रू धुराचा मारा करत लाठी चार्ज केला. या लाठीचार्जमध्ये कुंभारवळण गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अंजनाबाई कामटे ( वर्ष 60) असे महिलेचे नाव आहे.
दरम्यान या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच महिलेचा मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्येच ठेवणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.