पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवे आरोप समोर आले असून, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खळबळजनक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पार्थ पवार यांच्या नावाचं पत्र आणि सही वापरण्यात आली होती. मात्र, पार्थ पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की ते पत्र आणि सही त्यांची नाही. हा जमीन व्यवहार 25 मे 2021 रोजी झाला असून, संबंधित सर्व कागदपत्रे सरकारी यंत्रणांकडे सादर करण्यात आली आहेत, असंही कुंभार यांनी सांगितलं.
विजय कुंभार यांचा आरोप आहे की, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, एकाच नोटरी वकिलामार्फत कागदपत्रे तयार करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या सर्व घडामोडींची माहिती होती आणि राज्यातील वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाला संरक्षण दिलं जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे.
पार्थ पवारांवर कारवाई का नाही?
या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता, मात्र राजकीय दबावामुळे तसं होत नसल्याचा आरोपही विजय कुंभार यांनी केला. पार्थ पवार यांच्या‘अमेडिया’ या कंपनीशी संबंधित कोरेगाव पार्क (मुंढवा) परिसरातील सुमारे 40 एकर जमिनीच्या विक्री व्यवहारावरून हा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
अंजली दमानियांचा आक्रमक इशारा
पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी सांगितलं की, या जमिनीशी संबंधित पावर ऑफ अटॉर्नीमध्ये पार्थ पवार यांचा फोटो आणि प्रत्येक पानावर सही असल्याचं दिसतं. हे दस्तऐवज 2021 सालचे असून, काही वकिलांकडून आणि संबंधित पक्षांकडून ते पाठवण्यात आले आहेत. या कागदपत्रांमध्ये चॅट्स, संभाषणाचे पुरावे आणि काही अधिकाऱ्यांशी झालेला संपर्कही असल्याचा दावा त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, हे सर्व पुरावे पोलिसांकडे देण्यात आले असतानाही पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर तात्काळ अजित पवार यांचा राजीनामा घेण्यात आला नाही, तर आम्ही पुण्यात जाऊन थेट आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवारांबाबतही आरोप
अंजली दमानिया यांनी असंही स्पष्ट केलं की, अजित पवार निर्दोष असल्याचा दावा करू शकतात, मात्र या प्रकरणात त्यांचे काही अधिकारी सहभागी असल्याचे पुरावे समोर येत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी झालेल्या संभाषणांचे दाखले आमच्याकडे असून, याबाबत लवकरच न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. या प्रकरणासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जबाबदार धरलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या आरोपांमुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं असून, पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवे आरोप समोर आले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खळबळजनक दावे केले आहेत.
आरोपानुसार पार्थ पवार यांच्या नावाचं पत्र आणि सही या प्रकरणात वापरण्यात आली होती.
पार्थ पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, ते पत्र आणि सही त्यांची नाहीत.
हा जमीन व्यवहार २५ मे २०२१ रोजी झाला.
संबंधित सर्व कागदपत्रे सरकारी यंत्रणांकडे सादर करण्यात आली आहेत, असं कुंभार यांनी सांगितलं.